जेट एअरवेजच्या २ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा ‘ही’ कंपनी देणार ‘आधार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –आर्थिक डबघाईला आलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी विमान कंपनी स्पाईसजेट जेट एअरवेजच्या २ हजार कर्मचार्‍यांची भरती करण्याची योजना आखत आहे. आम्ही जेट एअरवेजच्या अनेक कर्मचार्‍यांना आमच्यासोबत जोडले आहे. यापुढेही आम्ही जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांच्या स्पाईस जेटमध्ये नियुक्तया सुरू ठेवणार असल्याची माहिती, स्पाईस जेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी दिली.

आम्ही सध्या जेटच्या एक हजार १00 कर्मचार्‍यांना स्पाईस जेटसोबत जोडले आहे. हा आकडा २ हजारांवर जाईल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. यामध्ये वैमानिक, क्रू मेंबर, विमानतळांवरील सेवा आणि सुरक्षेशी निगडीत कर्मचार्‍यांचा समावेश असल्याची माहिती सिंग यांनी दिली. सध्या स्पाईस जेटच्या ताफ्यात बोईंग ७३७, बंबार्डिअर क्यू ४00 आणि बी ७३७ फायटर विमानांचा समावेश आहे. तसेच ६२ ठिकाणी दररोज स्पाईस जेटच्या ५७५ विमानांचे उड्डाण होते. यामध्ये नऊ आंतरराष्ट्रीय ठिकाणांचाही समावेश असल्याचे सिंग म्हणाले.

तसेच मोठ्या आकाराच्या विमानांच्या उड्डाणांबाबत सिंग यांना विचारले असता, सध्या कंपनी केवळ छोट्या आकाराच्या विमानांच्या उड्डाणांवर लक्ष्य केंद्रीत करत असल्याचे ते म्हणाले. स्पाईस जेट सध्या आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत आहे. तसेच जेट एअरवेजद्वारे वापरण्यात येणार्‍या २२ विमानांना कंपनीने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.