Loksabha : चौथ्या टप्प्यातही ईव्हीएम मशीन बंद पडण्याची समस्या कायम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात होताच शिर्डी, शिरुर, नाशिक लोकसभा मतदार संघातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहे. अनेक ठिकाणी सुमारे एक ते सव्वा तास उशिरा मतदान सुरु होण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.

शिरुर मतदार संघात आज मतदान होत आहे. या मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या कोंढवा, मुंढवा या परिसरातील अनेक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सुरुच झाली नाही. त्यामुळे येथील मशीन बदलण्यात आल्या. त्यात सुमारे एक तास गेल्याने अनेक मतदार मतदान न करताच परत गेले.

श्रीरामपूर शहरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बिघडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव, तसेच शहरातील दोन शाळांमधील यंत्रे बिघडली. देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील माका अशा काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. त्या मशीन तातडीने बदलून देण्यात आल्या आहेत.

नाशिकमध्येही ईव्हीएम मशीन बिघडण्याची समस्या समोर आली आहे. नाशिकच्या विहितगाव केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. या ठिकाणी युतीचे उमेदवार हेमंत गोडसे मतदान करणार आहेत. पण, मशीन बंद पडल्याने त्यांच्या मतदानालाही विलंब लागला. तर धुळ्यातील गरताड मतदान केंद्रावर यंत्रणा बिघडली आहे. तेथे काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचे मतदान येथे आहे.
नाशिकमध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर ओळखपत्रावरुन पोलिसांशी वाद झाल्याने पोलिंग एजंटला जाऊ देण्यात आले नाही. शेवटी उमेदवार समीर भुजबळ यांना येथे यावे लागले.

महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी येत आहेत. शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सपत्नीक नारायणगाव येथील कोल्हे मळ्यातील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले.

मतदानासाठी सॅन फ्रान्सिस्कोहून नाशकात

तुषार वाखारकर हे मतदान करण्यासाठी थेट सॅन फ्रान्सिस्कोहून नाशकात दाखल झाले आहेत. ते अ‍ॅपल या कंपनीत अभियंता आहेत. त्यांनी यापूर्वी १९९५ मध्ये मतदान केले होते. त्यानंतर ते बंगलुरु येथील कंपनीत नोकरीला होते. त्यानंतर काही वर्षांनी ते अमेरिकेला गेले. सॅन फ्रान्सिस्को येथे राहू लागले. दोन वर्षापूर्वी ते अ‍ॅपल मध्ये नोकरी करु लागले. आपण मतदान करीत नसल्याची रुखरुख त्यांना जाणवत होती. त्यातूनच यंदा ते मतदानासाठी थेट अमेरिकेहून नाशिकला आले आहेत.