‘माधवबाग हृदय संगिनी’ स्वास्थ्य चळवळीचा शुभारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महिलांना हृदयविकारापासून विशेष धोका नसतो हा समज आता चुकीचा ठरत आहे. विशेषत: चाळिशीनंतर महिलांना पुरुषांच्या तुलनेत हृदयविकाराचा दुप्पट धोका असतो, असे संशोधकांना दिसून आले आहे. भारतीय स्त्री स्वत:पेक्षा कुटुंबाच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत असते. घरकामाप्रमाणेच आता अनेक महिलांना नोकरी, व्यवसायातील तणावांनाही सामोरे जावे लागते. यामध्ये त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.

चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, यामुळेही महिलांचे स्वास्थ्य तरुणपणीच बिघडण्यास सुरुवात होते. यासाठी महिलांमध्ये स्वत:च्या स्वास्थ्याविषयी जागरुकता वाढवण्याची आवश्यकता आहे. यामुळेच एल. ए. डी. कॉलेज ऑफ वुमेन, शंकरनगर, नागपूर येथे माधवबागद्वारा ‘हृदय संगिनी’ या स्वास्थ्य चळवळीचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी वुमन्स कॉलेजच्या प्रिन्सिपल व आहारतज्ज्ञ असलेल्या डॉ. दीपाली कोतवाल आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ चळवळीच्या शहराध्यक्षा मनीषा काशिकर यांची विशेष उपस्थिती होती. माधवबागचे मिलिंद सरदार यांनी या वेळी हृदय स्वास्थ्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हृदयविकाराशी यशस्वी लढा दिलेल्या निवडक महिलांचा या वेळी सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी माधवबागच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आणि महिलांसाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी ‘ब्युटी विथ हेल्थ’ ही आगळी व्यक्तिमत्व स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.

महिलांनी या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या ‘माधवबाग हृदय संगिनी’ स्वास्थ्य चळवळीच्या सदिच्छादूत आहेत. या उपक्रमात महिलांना अत्यल्प दरात वर्षभर हृदय स्वास्थ्यविषयक तपासण्या व वैद्यकीय मार्गदर्शन करून मिळणार आहे. या चळवळीअंतर्गत २०१९-२० या वर्षामध्ये एक लाख महिलांची स्ट्रेस टेस्ट केली जाणार आहे.