अभियंत्यांवर बूट फेकल्याचे प्रकरण : उपनेते राठोड यांच्यासह शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या

शहर शिवसेनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – प्रभारी शहर अभियंत्यांवर बूट भिरकाविल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा राजकीय आकसापोटी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दाखल केला असून, सदर गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. एका अभियंत्यांच्या पुढाकारातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी आज शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर शिला शिंदे, गटनेत्या रोहिणी शेंडगे, माजी महापौर अनिल बोरुडे, नगरसेवक गणेश कवडे, उपसभापती सुवर्णा गेणाप्पा आदींच्या सह्या आहेत.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले की, ‘प्रभाग क्र.7 मध्ये बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक या विकासकामासंदर्भात ठेकेदाराला 16 फेब्रुवारी 2019 रोजी कार्यआरंभ आदेश देऊनही एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या दहशत व दबावापोटी सदर ठेकेदाराने काम सुरू केले नाही. सदर बाब वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. कोणीही याबाबत कठोर भूमिका घेऊ शकले नाही. शिवसेनेचे त्या प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका, पक्षाच्या पदाधिकारी व नागरीकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर 27 एप्रिल रोजी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला होता. त्यावेळी अभियंता विलास सोनटक्के हे दिशाभूल करणारी, उद्धट उत्तरे देत होते. एका कार्यकर्त्याने गैरसमजुतीने बूट भिरकावला. परंतु तो सोनटक्के यांना लागलेला नाही. हा वाद संपला होता. मात्र, राजकीय विरोधक असलेल्या विरोधकांच्या जवळच्या एका अभियंत्याच्या प्रयत्नातून सोनटक्के यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली व शिवसैनिकांविरुद्ध आकसापोटी खोटा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करून गुन्हा मागे घेण्यात यावा.’

शिवसेनेचा रोख कोणत्या अधिकाऱ्यावर?
शिवसेनेने गुन्हा दाखल करण्याबाबत एका अभियंत्यावर आरोप केलेला आहे. निवेदनात सदर अभियंत्याचे नाव नमूद नाही. त्यामुळे तो अभियंता नेमका कोण आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.