बहिनीला छेडल्याचा संशयावरून खूनी हल्ला 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  –विठ्ठलनगर, पिंपरी येथे बहिणीला छेडल्याच्या संशयावरून तरुणावर चाकूने वार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 30) रात्री नऊच्या सुमारास घडली.

सूरज घोडके (21, रा. विठ्ठलनगर, पिंपरी ) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अजय बिराजदार (वय 22, रा. विठ्ठलनगर, पिंपरी ) असे संशयित आरोपीचे नाव असून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सूरज घोडके याने आरोपी अजय याच्या बहिणीची छेड काढली असल्याचा संशय अजयला होता. या रागातूनच त्याने सोमवारी रात्री सूरजवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये सूरज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरा पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

Visit : Policenama.com