अडचणीचे प्रश्न आल्याने जावडेकरांनी घेतले आटोपते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यांच्यावर आरोप केले जात होते त्याच नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये घेणे आणि घराणेशाही आदी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.

पुण्यात गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी जावडेकर यांची आज सायंकाळी सभा होत आहे. या सभेसाठी पुण्यात आल्यानंतर जावडेकर यांनी काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणांविषयी भूमिका मांडण्यासाठी तातडीने पत्रकार परिषद बोलाविली होती. यावेळी जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.”गरीब कुटुंबांना दरमहा 12 हजार रुपये देण्याची घोषणा फसवी आहे. यापूर्वी सत्तेत असताना काँग्रेसने गरिबांसाठी काहीच केले नाही. भाजपच्या कालावधीत 35 कोटी गरीब कुटुंबांची बँक खाती उघडली गेली.१९७१ साली काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता. पण गरीबी हटली नाही. आज भाजपच्या काळात गरीब आणि लाभार्थींच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होत आहे. असे सुमारे साडेचार लाख कोटी रुपये जमा झालेले आहे. त्यामुळे 80 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. काँग्रेसच्या कालावधीत आर्थिक विकासाचा दर हा कधीही साडेतीन टक्क्यांच्या पुढे गेला नाही. तो भाजपने 12 टक्क्यांपर्यंत नेला आहे. पराभव दिसू लागल्यामुळे काँग्रेस गोंधळून गेली आहे. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नाहीये लोकांना मोदींसारखा नेता हवा आहे. त्यांच्या हातात देश सुरक्षित राहील असा विश्वास जनतेला आहे. या कारणामुळेच भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.” असे जावडेकर म्हणाले.

पत्रकारांनी भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंग विषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील इतर नेत्यांवर भाजपकडूनच टीका केली जात होती. त्यांच्याच मुलांना उमेदवारी दिली जात आहे. घराणेशाही टिकविली जात आहे असे वाटत नाही का ? असे विचारल्यानंतर जावडेकर यांनी याबाबत नंतर बोलु असे सांगून वेळ मारून नेली.