Coronavirus : भारतातील पहिली सॅनिटायझेशन व्हॅन ‘संजिवनी’ पुणे शहर पोलिस दलात दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे देश लॉकडाऊन आहे. या काळात डॉक्टर आणि पोलिसच फक्त काम करत आहेत. पोलिसांना तर कोणतीच सुविधा नाही. मात्र, पुणे पोलिसांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक अशी मोबाईल सॅनीटायझेशन मोबाईल व्हॅन तयार केली आहे. देशातील पहिलाच प्रयोग आहे. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या संकल्पनेतून सुविधा सुरू केली आहे.

जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. राज्यात संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र तरीही काहीजण बाहेर पडत आहेत. दरम्यान पोलीस नागरिकांवर देखरेख करत आहेत. फक्त पोलीस आणि डॉक्टर या कठीण काळात काम करत आहेत. या परिस्थितीत पोलिसांच्या त्यांच्या आरोग्यासाठी कोणतीही सुविधा नाही. पोलिसांना वेळप्रसंगी रुग्णालयात आणि रुग्णाचा शोध देखील घ्यावा लागतो.

त्यामुळेच पुणे पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी “मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन” वाहन ही सुविधा सुरू केली आहे.

पुणे पोलीस मोटर परिवहन विभागामधील वाहनाचा उपयोग करण्यात आला आहे. गाडीत स्प्रेशर फॉगिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. गाडीमध्ये कर्मचारी 6 ते 7 सेकंदांसाठी उभे राहिल्यास निर्जंतुकीकरण होऊन त्याचा परिणाम काही तासांसाठी राहतो. ह्या वाहनाद्वारे कर्तव्यास ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी कामास असतील त्या ठिकाणी जाऊन ही सुविधा देण्यास मदत होईल.

भारतात पुणे पोलिसांनी प्रथमच संजीवनी वाहनाचा असा प्रयोग केला असून दिवसभर राबणाऱ्या पोलीस कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबविला गेल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सुविधा ही दीपक रोंधे, रोंधे एंटरप्रायजेस यांच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा धोका कमी झाला असून, याचा उपयोग बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येणार आहे.