2009 सालीच लागला होता राष्ट्रवादीला ‘माहेर’घरातून ‘सुरुंग’, राष्ट्रवादी सोडण्यात दौंडचा नंबर 1

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुका हे माझे माहेरघर असून या तालुक्याने मला भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे आपल्या अनेक भाषणांमध्ये सांगत असतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दिग्गज नेत्यांचे होत असलेले आउट गोईंग आणि भाजपमध्ये त्यांचे होत असलेले इनकमिंग पाहता संपूर्ण राज्यामध्ये याबाबत विश्लेषणात्मक चर्चा सुरू आहे. या गोष्टींना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि त्यांची निवडून येईल तो आपला ही वृत्ती जबाबदार असल्याचा निष्कर्ष आता राजकीय जाणकारांच्या चर्चेतून पुढे येत आहे.

दौंड तालुका हा तसा सर्वच बाजूंनी सधन तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्याला दळण वळणाच्या दृष्टीने इंग्रजांच्या काळामध्ये दौंडमधून गेलेली रेल्वे लाईन, दौंडच्या मध्यातून जाणारा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि पाण्यासाठी नैसर्गिकरित्या प्राप्त झालेली मुळा-मुठा, भीमा नदी, शेतीसाठी बारा महिने पाणी उपलब्ध करून देणारा खडवासला मुठा उजवा कालवा हे पाण्याचे उपलब्ध मोठे सोर्स सर्व तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने भक्कम आधार ठरले आहेत. परंतु तरीही या बारामती व अन्य तालुक्यांच्या तुलनेत मागील काळात दौंड तालुक्याचा रखडलेला विकास आणि दौंडची विकासाच्या दृष्टीने अपेक्षित असणारी वाढ का झाली नाही. याचे कोडे आता उलगडले जात असून नेमके याला जबाबदार तरी कोण याचे उत्तर येथील जनतेने शोधले आहे.

याची कारणे शोधण्यासाठी थोडे मागे गेले तर १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर दौंडचे त्यावेळचे स्व.आमदार सुभाषअण्णा कुल यांनी राष्ट्रवादी सोबत राहण्याचे ठरवले. त्यानंतर दोन वर्षांमध्येच सुभाष अण्णांचे आकस्मिक निधन यानंतर मात्र तालुक्यामध्ये झालेली कुल-थोरात गटबाजी थांबवण्याऐवजी त्याला खतपाणी घालण्याचे काम पक्षातीलच काही नेतेमंडळींनी करत कुल-थोरात यांना झुलवत ठेवले आणि दौंडमध्ये जो निवडून येईल तो आपला हे सूत्र वापरत राहुल कुल निवडून आले तरी आपलेच आणि रमेश थोरात आले तरी आपलेच असे एक म्यान मे दो तलवार असे सुत्रच जणू थोपवले गेले. वास्तविक पाहता माजी आमदार सुभाषअण्णा कुल यांचे निधन झाल्यानंतर लगेच गट-तट पाडले जाणे हे कुणालाच शोभणीय नव्हते परंतु तरीही या घटना घडल्या.

या गोष्टींचा तान नको आणि याची जबाबदारी आपला मुलगा चांगल्या प्रकारे पेलू शकतो हे ओळखून स्व.आमदार सुभाषअण्णा कुल यांच्या पत्नी व माजी आ. रंजना कुल यांनी २००४ ला स्वतः ऐवजी आपल्या मुलाला म्हणजेच राहुल कुल यांना पक्षाचे तिकीट देण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी राहुल कुल यांना डावलून रंजना कुल यांनाच तिकीट देण्यात आले आणि येथूनच राहुल कुल यांच्या खच्चीकरणाचा पाया रोवला गेल्याचे आ.राहुल कुल यांचे जेष्ठ समर्थक सांगतात इतके होऊनही एवढ्यावर न थांबता राष्ट्रवादीने राहुल कुल यांना जिल्हा बँकेचे उमेदवारी दिल्यानंतर रमेश थोरात यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असतानाही त्यांना ऐनवेळी राष्ट्रवादीमध्ये घेऊन जिल्हाबँकेवर घेत राहुल कुल यांना एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर झालेल्या २००९ च्या विधानसभा निकडणुकीमध्ये राहुल कुल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट देऊनही पक्षांतर्गत गटबाजी करून राहुल कुल यांना पाडण्यात आले. हाच पराभव कुल समर्थकांच्या मोठ्या जिव्हारी लागून राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यातून पडझडिला सुरुवात झाली.

२००९ ला विधानसभेच्या निवडणुकीत राहुल कुल यांच्यासोबत राहून त्यांच्या रणनितीमध्ये सामील होऊन राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी रमेश थोरात यांचे काम केले होते. हे आजही राहुल कुल व त्यांचे कार्यकर्ते नावासह सांगतात व त्याचा प्रत्यय हा रमेश थोरात यांचा २००९ ला विजय झाल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीत अनेकांनी पाहिला. या झालेल्या कुरखोड्यांना वैतागून अखेर कुल समर्थक आणि खुद्द राहुल कुल यांनी २००९ ला राष्ट्रवादीतून फारकत घेतली. कारण जर कुल यांना पाडायचेच होते तर खुलेआम त्यांना सांगून किंवा तिकीट न देता पाडायला हवे होते असे मत कार्यकर्ते बोलून दाखवत होते. सोबत राहून पाठीत खंजीर खुपसण्याचा हा प्रकार होता आणि येथूनच राष्ट्रवादीच्या माहेरघराला घर घर लागण्यास सुरुवात झाली. २००९ साली राष्ट्रवादीशी फारकत घेऊन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनाच मोठा धक्का देत रासपच्या चिन्हावर आमदार झालेले राहुल कुल हे भाजपकडे गेेले ते परत पवारांकडे फिरकले नाहीत.

रासप-भाजप या मित्र पक्षाकडून उमेदवारी घेत कुठलेही मोठे पाठबळ नसताना केवळ दौंडच्या जनतेच्या भरवश्यावर निवडणूक लढून ती खऱ्या अर्थाने जिंकून दाखवली आणि येथेच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा सुरुंग लागला त्याची पडझड आता संपूर्ण राज्यामध्ये दिसून येत असली तरी याची खरी सुरुवात ही पवारांच्या माहेर घरातूनच झालेली होती हे कुणीही नाकारू शकत नाही.

आरोग्यविषयक वृत्त –