शिवसेना खासदार ओमराजे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील समर्थक सतीश दंडनाईक यांनी ओमराजे यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल केला होता. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस कोर्टाने जामीन मंजूर केला असून शिवसेना खासदार ओमराजेसह हिम्मतराव पाटील, रवी पाटील यांचा जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहीती जयराजे निंबाळकर यांनी दिली.

कळंब पंचायत समिती सभापती निवडीवरून मारहाण केल्याची तक्रार उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक यांनी दिल्यानंतर ओमराजे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दंडनाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की 29 डिसेंबर रोजी ते स्वत:, गणेश भातलवंडे व गाडी चालक पोपट चव्हाण हे मिळून रात्री 8.30 वाजता अकलूज येथे गेलो. कळंब पंचायत समिती सदस्य हिम्मतराव पाटील यांच्या घरी असल्याची खात्री करण्यासाठी गेलो असता 3 पंचायत समिती सदस्य देण्याची विनंती केली, हे सदस्य स्वखुशीने आलेत की बळजबरीने याची खात्री करायची असे सांगितल्यावर हिम्मतराव पाटील यांनी दंडनाईक यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी मी पळालो असता माझा 1 किमी पाठलाग करून मला पकडले व घरात आणून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

हिम्मतराव पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन लावला व सांगितले की मी यांना पकडले आहे त्यावर ओमराजे फोनवर म्हणाले की त्यांना सोडू नका त्यांना धडा शिकवा असे मी फोन स्पीकरवर ऐकले आहे. त्यानंतर पाटील यांनी सत्ततूर डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला व भातलवंडे आणि चव्हाण यांनाही पकडून मारहाण केली. हिम्मतराव पाटील यांनी त्यानंतर आम्हाला अकलूज पोलिसांच्या ताब्यात दिले माझ्या पायाला व हाताला मुक्का मार लागला आहे. मी घाबरल्याने फिर्याद दिली नव्हती. मात्र माझी मानसिक स्तिथी ठीक झाल्याने व भीती कमी झाल्याने अटकेत असताना तक्रार देत आहे.

दरम्यान भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर देखील हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद असून ते फरार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/