मुलगा डॉ. सुजयसाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे शरद पवारांना साकडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झालेली असली तरी अहमदनगरच्या जागेवरून गेल्या अनेक दिवसांपासुन दोन्ही पक्षांमध्ये वाद चालु आहेत. अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, ती जागा राष्ट्रवादी सोडणार नाही असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वेळावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यापार्श्‍वभुमीवर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज थेट वक्‍तव्य करीत शरद पवार पितृतुल्य असून त्यांनीच आता नातवासाठी म्हणजेच सुजय विखे पाटील यांच्यासाठी जागा सोडावी असे म्हंटले आहे.

डॉ. सुजय विखे-पाटील हे लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा यापुर्वीच होत आहे. अहमदनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असल्याने अहमदनगरच्या जागेवरून मोठा पेच निर्माण झाला. राधाकृष्ण विखे-पाटील हे मुलासाठी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होवु लागली असतानाच आज (रविवार) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवार हे पितृतुल्य असून त्यांनी नातु समजुन सुजय यांच्यासाठी जागा सोडावी असे वक्‍तव्य केले आहे. त्यामुळे अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार की काँग्रेसकडे जाणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.