मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल मुख्यमंत्री म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी डायलॉग उच्चारून पुन्हा सस्पेन्स कायम ठेवला आहे. ‘ऑपरेशन विखे पाटील‘ नंतर ‘ऑपरेशन मोहिते पाटील’ भाजप करणार आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या ! असे उत्तर दिले आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची संपूर्ण तयारी झाली असून येत्या काही दिवसात राज्यातील सर्व जागांची यादी दिल्ली मधून जाहीर करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मोदींच्या नेतृत्वात देशाने मोठी प्रगती केली आहे. म्हणून लोकांनी पुन्हा मोदींना निवडून देण्याचा निर्धार केला आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते वेळोवेळी भाजपमध्ये दाखल होतील असे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील उद्या भाजपमध्ये जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. उद्या दुपारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता आगे आगे देखो होता है क्या ! असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.