जेजुरी पोलीस स्टेशनाच्या हद्दीत ‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ होणार कार्यान्वित

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच लोकांना ऐनवेळी अत्यावश्यक सूचना देण्यासाठी उपयुक्त असलेली ग्राम सुरक्षा यंत्रणा जेजुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गावात लवकरच सुरु करण्यात येते आहे. आज जेजुरी येथील एका मंगल कार्यालयात पोलीस पाटील, ग्रामसेवक व गावातील पदाधिकारी यांच्यासाठी या यंत्रणेबाबत एक प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी याबाबतची माहिती दिली.

देशामध्ये चोरी, मारामारी, दंगल नैसर्गिक संकट किंवा नागरिकांना द्यावयाच्या तातडीच्या सूचनासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणाही अत्यंत उपयोगी आहे. या यंत्रणेमुळे आत्ता पर्यंत अनेक गुन्हे तातडीने उघड झाले आहेत. त्याच बरोबर गुन्हेगारांना एक तासाच्या आत पकडण्यात आले आहे. यामुळे ही यंत्रणा प्रत्येक गाव व नागरिकांसाठी महत्वाची आहे. त्यामुळे सर्व गावांनी ही यंत्रणा कार्यान्वित करावी असे आवाहन या ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोरडे यांनी केले आहे.

आज ते जेजुरी येथे पोलीस पाटील ,ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांना या यंत्रणेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी जेजुरी येथे आले होते यावेळी त्यांनी माध्यमांना या यंत्रणेची माहिती दिली. ते म्हणले की,ही यंत्रणा स्वयंचलित आहे,गावाने यात सहभाग घेणे अत्यंत सोपे आहे. संपूर्ण भारतासाठी १८००२७०३६०० हा एकच टोलफ्री नंबर आहे. या यंत्रणेत असणारा कोणताही व्यक्ती संपूर्ण परिसराला एका कॉल मध्ये सावध करू शकतो. संदेश देणाऱ्या व्यक्तीचा संदेश त्याच्या आवाजात एकाच वेळी आवश्यक परिसरात पोहचतो.

दुर्घटनेचे स्वरूप त्याची तीव्रता, ठिकाण याबाबतची माहिती कळल्याने तातडीने मदत पोचवता येते. नियम बाह्य संदेश अथवा अपूर्ण संदेश पुढे पाठवले जात नाहीत. चोर एका गावातून चोरी करून पुढे गेल्यास दुसऱ्या गावातील लोकांना लगेच सावध करता येते. अश्या प्रकारचे अनेक उपयोग या यंत्रणेचे आहेत.

कशी काम करते ही यंत्रणा ?
संकटातील व्यक्तीने (उदा. चोरी, दरोडा,अपघात, जनावरांचा हल्ला किवा अन्य संकट ) टोल फ्री नंबरला फोन केल्या नंतर त्यावर संकटा बाबत त्याच्या ठिकाणासह व्हाईस संदेश द्यायचा. त्यानंतर हा संदेश त्या गावात किवा परिसरात आवश्यकता पाहून त्या यंत्रणेत सहभागी असणाऱ्या सर्व लोकांना कॉल जातो व घटनेची माहिती दिली जाते.त्याच बरोबर पोलीस स्टेशन व इतर शासकीय यंत्रणांना सुद्धा कॉल जातो. त्यामुळे संकटातील व्यक्तीला तात्काळ मदत मिळते.

त्याच बरोबर नैसर्गिक संकटात किंवा कुठे अफवा पसरत असल्यास संबधित विभागाकडून तातडीने संदेश देवून लोकांना सावध करता येते. हे सर्व कॉल सर्वांना एकाच वेळी जातात. तर घटना गंभीर असेल तर जो पर्यत फोन रिसीव्ह होत नाही तो पर्यत रिंग वाजत रहाते. जेजुरी येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात डी. के. गोरडे यांचे बरोबरच ग्रामसुरक्षा यंत्रणा विभागीय अधिकारी गणेश लोहकरे, विभागीय अधिकारी अशोक हिंगणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे यानी मार्गदर्शन केले. पोलीस उप निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यानी आभार मानले.