निर्भया केस : दोषी पवन गुप्ताची याचिका फेटाळली, वकिलाला ‘दंड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी आरोपी पवन गुप्ताची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. आरोपीच्या वयाबाबत लपवाछपवीचा खेळ खेळण्यात आल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने याचिका फेटाळली असून आरोपीचे वकील ए. एन. सिंह यांना 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.

न्यायालयाने निर्देश दिले की पवन गुप्ताच्या वयाबाबत खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल दिल्ली बार कौन्सिलने ए. पी. सिंह यांच्यावर कारवाई करावी. पाहिल्यांदा या याचिकेवर न्यायालयाने 24 जानेवारीला सुनावणी होणार असे सांगण्यात आले होते. परंतु निर्भयाच्या आईने आजच या प्रकरणी सुनावणी व्हावी अशी आर्जव केल्याने न्यायालयाने आज सुनावणी केली.

निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यातील एक आरोपी पवन गुप्ता याने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करुन तो घटनेवेळी अल्पवयीन होता असा दावा केला होता. यावेळी ए. पी. सिंह यांनी पवनची बाजू न्यायालयात मांडली. त्यांनी युक्तीवाद केला की पवन गुप्ताची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली नाही. परंतु त्यांचा हा युक्तीवाद अमान्य करत पवन गुप्ताची याचिका न्यायालयाने फेटाळली.

या प्रकरणातील दुसरा एक दोषी अक्षय ठाकूर याची याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे निर्भयांच्या पालकांनी न्यायालयाच्या निर्णयांवर समाधान व्यक्त केले आहे. परंतु न्यायालयाने अजूनही डेथ वारंट न काढल्याने निर्भयाच्या आईने नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की त्यांना अजूनही तारखांवर तारखा मिळत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/