निर्भया केस : तिहारमध्ये दोषींना फाशी देण्याची तयारी पुर्ण, लटकवलं ‘डमी’ फासावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपींना 20 मार्च रोजी तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी आरोपींना फाशी देण्याची रंगीत तालीम तिहार तुरूंगात पार पडली. आरोपींना फासावर लटकवण्यासाठी पवन जल्लाद तुरुंगात आला असून त्याने आरोपींचे डमी फासावर लटकवले. जल्लाद पवन याने तुरुंग प्रशासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोषींच्या पुतळ्याला फाशी देऊन ट्रायल पूर्ण केली.

तिहार प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी जल्लाद पवन याला तुरुंगात पाचारण केलं आहे. दिल्लीच्या न्यायालयाने 20 मार्च रोजी सकाळी दोषींना डेथ वॉरंट जारी केलं आहे. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह (वय-32) पवन गुप्ता (वय-25), विनय शर्मा (वय-26), अक्षयकुमार सिंह (वय-31) यांचे सर्व कायदेशीर पर्याय जवळपास संपुष्टात आलेत.

दोषींनी राष्ट्रपतींकडे केलेली दया याचना देखील फेटाळून लावली आहे. पण, आता या दोषीपैकी तिघांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला फाशीपासून वाचवण्यासाठी पत्र लिहले आहे. तर यातील एकाच्या पत्नीनं आपल्या दोषी पतीला वाचविण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या आरोपींवर तीन वेळा डेथ वॉरंट जारी करण्यात आलंय. आता 20 मार्च रोजी त्यांना फासावर चढवण्यात येईल. त्यासाठी तुरुंग प्रशासनाने सगळी तयारी पूर्ण केली आहे.