ठाकरेंचं आश्वासन आम्ही केलं पूर्ण शिवरायांच्या पुतळ्यावर उभारलं छत्र : नितेश राणे 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन-आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यावर छत्र उभारण्याचं आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. मात्र त्यांनी ते पाळलं नाही, आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर कुरघोडी करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारलं आहे. एवढंच नाही तर, ‘आम्ही दिलेले शब्द पाळतो, पहिले आमचे छत्रपती मग जाऊ करा अयोध्येत आरती’ असा ट्विट करत शिवसेनेला टोलाही लगावला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्याची घोषणा केली होती. मात्र शिवरायांच्या पुतळ्यावर छत्री उभारुन नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने अनोखं आंदोलन केलं. शिवसेनेवर कुरघोडी करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात छत्रपतींच्या डोक्यावर छत्र उभारले. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे.

इतकंच नाही तर उद्धव ठाकरे नेहमी भगव्याचं राजकारण करत आले. आता अयोध्याला जाऊन फक्त राजकारण करत आहेत. मंदिर उभारण्याची त्यांची कुवत नाही, अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

शिवजयंतीला दिलेला उद्धव ठाकरेंनी इशारा

मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करुन ठेवलं आहे. तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना इथे रायगड उभा करेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करताना दिला होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 4 मार्चला पूजन करुन शिवसेनेने शिवजयंती साजरी केली होती.

मात्र छत्र उभारण्याचा बहुदा शिवसेनेला विसर पडला असावा. नेमकी हीच संधी साधत नितेश राणे यांनी छत्र उभारलं आणि शिवसेनेची राम मंदिर उभारण्याची कुवत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

विनायक मेटे चायनीज मराठा

विनायक मेटेंनी मराठा आरक्षणावर बोलूच नये. ते स्वतः मराठा आहेत का, याबाबत आम्हाला शंका आहे. मला तर वाटतं ते चायनीज मॉडेलचे मराठा आहेत. त्यांचा डीएनए चेक करण्याची गरज आहे. आम्ही मूळचे 96 कुळी मराठा आहोत, अशा शब्दात नितेश राणेंनी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा समाचार घेतला.