‘माझेच लोक माझे ऐकत नाही’ : नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन  – महानगरपालिका तर सोडाच माझ्या आयडीयांना अनेकदा माझे सरकारच मदत करत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. माझेच लोक माझे ऐकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ‘मी नागपूर महानगरपालिकेला तसेच अन्य ठिकाणी अनेक चांगल्या आयडीया मी सुचवत असतो. परंतु महानगरपालिका तर सोडाच माझ्या आयडियांना अनेकदा माझे सरकारच मदत करत नाही. सरकारमधील लोक बैलासारखे मान खाली घालून एकाच चाकोरीत चालतात असं परखड वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर इनोव्हेशन पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्या प्रसंगी गडकरी बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे रविवारी (दि- 3 मार्च) हा सोहळा पार पडला. यावेळी गडकरींनी आपल्या भावना मांडत उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, “आज आपल्या देशाला इनोव्हेशनसची गरज आहे. जगातील कोणतीच गोष्ट टाकऊ नसते. त्याचा उपयोग करून अनेक समस्या सोडवता येतात. नागपूर शहरातील सांडपाणी उर्जा प्रकल्पाला विकून त्यातून कोट्यावधी रुपये कमाविता येतील ही संकल्पना मी मनपाला दिली. आज मनपा त्यातून तब्बल 80 कोटी रुपये कमावित आहे. इतकेच नाही तर, जुन्या ज्या बसेस आहेत त्यांना सीएनजी लावून चालवण्याचीही संकल्पनासुद्धा मी त्यांना दिली. त्यातून त्यांचे सुमारे 60 कोटी रुपये वाचले आहेत. या आणि अशा अनेक संकल्पना मी मनपाला देतो. पण त्या फारशा प्रत्यक्षात उतरत नाहीत. महानगरपालिका तर सोडाच त्यांना अनेकदा माझे सरकारच मदत करत नाही सरकारला बैलासारखी मान खाली घालून एकाच चाकोरीत चालायची सवय लागली आहे.” असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.

दरम्यान सदर महापौर इनोव्हेशन स्पर्धेत नागपूर शहरातील समस्यांवर उपाय सुचवणाऱ्या संकल्पना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी शेकडो सकंल्पना सुचविण्यात आल्या. तीन गटांमध्ये ही स्पर्धा झाली.  गडकरी यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय ज्या पहिल्या 100 उत्तम संकल्पना होत्या त्यांना नामांकन देण्यात आले. त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. रेणुका देशकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.

‘भारतात जैवइंधनाच्या क्षेत्रात संशोधन होण्याची गरज’

भारतात जैवइंधनाच्या क्षेत्रात संशोधन होण्याची गरज आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “विविध प्रकारची जैवइंधने तयार केल्यास त्याद्वारे उर्जा आणि इंधनाची समस्या सोडविणे शक्य आहे. इतकेच नाही त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. मी गेल्या अनेक वर्षांपासून  या क्षेत्रात काम करत आहे. सुरुवातीला माझ्या संकल्पना फारशा गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. परंतु यंदा 26 जानेवारी रोजी झालेल्या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये वापरण्यात आलेल्या विमानांमध्ये 100 टक्के जैवइंधनाचा वापर करण्यात आला.” असेही गडकरी यांनी सांगितले.