Coronavirus : जगभरात ‘हाहाकार’ माजवणारा ‘कोरोना’ असा दिसतो, शास्त्रज्ञांनी काढला पुण्याच्या लॅबमध्ये फोटो

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या आणि हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरचा फोटो पुण्यातील लॅबने काढला आहे. या व्हायरसमुळे जगभरातील 150 पेक्षा अधिक देशात थैमान घातले आहे. लाखो लोकांना याचा संसर्ग झाला आहे तर 20 हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यावर अद्याप औषध सापडले नसले तरी कोरोनाचा फोटो मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

पुण्यातल्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी Transmission electron microscope imaging चा वापर करून कोरोना व्हायरसला कॅमेऱ्यात कैद केले आहे. याबाबतची माहिती Indian journal of Medical Research मध्ये प्रकाशीत झाल्याचे वृत्त एका हिंदी दैनिकाने दिले आहे.

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. वुहानमध्ये शिकणारे काही विद्यार्थी भारतात परतले होते. त्यांच्या घशातल्या द्रवांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी आले होते. भारतातील ही पहिलीच चाचणी होती. त्या तिघांचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहोत. त्या नमुन्यातून हे फोटो मिळविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. कोरोना विषाणूवर जगभरात कोठेही लस उपलब्ध नाही. त्यावर संशोधन सुरु आहे. भारतामध्ये एकमेव आणि विख्यात असलेल्या एनआयव्ही (NIV) मध्ये यावर संशोधन सुरु आहे. या ठिकाणच्या शास्त्रज्ञांना हे यश मिळालं असून याचा पुढील संशोधनात फायदा होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

देशभरात कोरोना व्हायरसमुळे 700 पेक्षा अधिक जण संक्रमीत झाले आहेत. 18 जणांचा यामुळे मृत्यू झाला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कठोर उपाययोजना करत आहे. देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 130 रुग्ण आढळून आले आहेत.