कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही; धनंजय मुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून राज्यात गेली तीन ते चार दिवस त्यावरच चर्चा बघायला मिळत आहे. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावरून भाष्य करताना गृहमंत्री म्हणाले, कायद्यापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नसल्याचे सांगितले आहे.

गृहमंत्री देशमुख म्हणाले, कायदा कुणासोबतही भेदभाव करणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाई करु. कायद्यापुढे कोणताही मंत्री किंवा संत्री मोठा नाही. कायद्यासमोर सर्व समान असतात. सध्या धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे. यामधून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर, या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? या प्रश्नावर उत्तर देण्याचे अनिल देशमुख टाळले आहे. पण चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे त्यांनी पुढे सांगितले.

तसेच, या प्रकरणावरून गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचे सांगण्यात येते. तर पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच, मी राजीनामा दिलेला नाही, असे धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत सांगितले आहे.

‘तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई’ – शरद पवार

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सौम्य भूमिका घेतली आहे. महिलेचे आरोप ऐकून मी त्यासाठी गंभीर शब्द वापरला होता. मात्र, मी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर अनेकांनी त्याच महिलेवर अतिशय गंभीर आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यात तथ्य आढळल्यास पक्षाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असं शरद पवार म्हणाले.

‘धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळं वळण’-

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार महिला ही ब्लॅकमेलर आहे, तिने आमच्यासोबतही अशाचप्रकारे हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी समोर आले आहेत, धनंजय मुंडे यांनीही महिला ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत आहे, तिने माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केलेल्याचे अनेक मेसेज आहेत असा दावा केला होता, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.