दिलासादायक ! महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना महामारीच्या संकटानंतर आता बर्ड फ्लूच नावाचे मोठे संकट उभे राहिले आहे. देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, केरळ आदी पाच राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा कहर सुरू आहे. पण महाराष्ट्रात अद्याप ‘बर्ड फ्लू’ची एकही घटना आढळून आलेली नाही, अशी माहिती राज्याच्या वनविभागाने दिली आहे. महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचे एकही प्रकरण आढळून आले नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी पीटीआयला सांगितले आहे.

मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’मुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्येही ‘बर्ड फ्लू’ची प्रकरण समोर आली आहेत. केरळच्या कोझिकोड येथील दोन पोल्ट्री फार्मध्ये ‘बर्ल्ड फ्लू’ पसरल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये बर्ड फ्लूचा कहर वाढल्याने हायअलर्ट देखील जाहीर केला आहे. तसेच केरळमध्ये ‘बर्ड फ्लू’ला राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘बर्ड फ्लू’ची फैलाव माणसांमध्येही होण्याची दाट शक्यता असते. याआधी 2006 मध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाला होता. त्यावेळी हजारो कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ची लागण झाली होती.