पुण्यासह मराठवाड्यात गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यभरात हवामान बदलत आहे. कधी कडक उन्ह तर कधी मुसळधार पाऊस. पुण्यासह राज्यात अनेक शहरांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. पण आता राज्यात पावसाची स्थिती कायम असून, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यभरात विविध ठिकाणी काल पाऊस झाला. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी विजा कोसळल्याने किमान 11 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील भोर या ठिकाणी वीज पडून दोन लहान मुलींचा जीव गेला आहे. तर मराठवाड्यात एकूण 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अस्मानी संकटात काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला.

दरम्यान, राज्यात आजही पावसाची स्थिती कायम असून, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. एकीकडे कोरोना व्हायरसमुळे सगळे चिंतेत असताना आता या पावसामुळे मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे.

पुणे, धुळे, नाशिकसह अवकाळी पाऊस

नंदुरबार, सातारा, जळगाव, धुळे, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि नाशिक या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच या ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर या सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीटीचाही अंदाज आहे.