‘महाराष्ट्रानं काय करावं, हे शिकवणं अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याच्या कक्षेत येत नाही’

मुंबई : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेतील ट्विटर युद्धाने चांगलाच जोर धरला आहे. अ‍ॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याच्या निर्णयावरून अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या टीकेला शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. महाराष्ट्रानं काय करावं, हे शिकवणं अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कक्षेत येत नाही, असे चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांना सुनावलं आहे.

ठाणे महापालिकेने अ‍ॅक्सिस बँकेत असलेली सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला. त्या अगोदर पोलिसांची पगाराची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयावर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’ असे ट्विट त्यांनी केले होते. त्यांच्या याच ट्विटला चतुर्वेदी यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, अमृता फडणवीस यांना शेवटची पण, छोटी नसलेली सूचना आहे. महाराष्ट्राला परिक्षण करुन महाराष्ट्रानं काय करावं हे शिवण्याचे काम नक्कीच एका अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याचं नाही. त्यांची मुलाखत वाचून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोणत्या परिस्थितीत अ‍ॅक्सिस बँकेत खाते वळवण्यात आली, याची चौकशी करावी. त्याचबरोबर अ‍ॅक्सिस बँकेत खाते वळवण्यात आल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेकडून भाजपच्या योजनांसाठी सीएसआर निधी देण्यात आला होता की नाही, याचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/