ईव्हीएममध्ये नव्हे तर हिंदूंच्या मेंदूत फेरफार : असदुद्दीन ओवैसी

हैद्राबाद : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या झालेल्या दणदणीत विजयावर एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. त्यांनी असे म्हटलं आहे की ‘ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आलेला नाही, तर हिंदूंच्या मेंदूत फेरफार करण्यात आला’. अशी जोरदार टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी हैद्राबाद लोकसभा मतदारसंघातन दणदणीत विजय मिळविल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने स्वायत्त असले पाहिजे. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील मतांची १०० टक्के पडताळणी झाली पाहिजे, असे मला वाटते. मात्र निकाल बघितल्यानंतर मला वाटते कि ईव्हीएममध्ये नव्हे तर हिंदूंच्या मनामध्येच हेराफेरी झाली आहे.

‘राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपाचा सामना करु न शकल्याने विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. विरोधकांना आता नव्याने धोरणं आखण्याची गरज आहे. याशिवाय भाजपाकडे जे निवडणूक तंत्र आहे, त्याने भाजपाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे’.