पिस्तूल विक्रीसाठी आलेले सराईत २ गावठी पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसांसह जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ गावठी पिस्तूले आणि ४ जिवंत काडतुसे असा १ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (रा. सोमवारपेठ) व मुनाफ रियाज पठाण (रा. डोके तालीम) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील सराईत गुन्हेगार रोहन उर्फ दुध्या चव्हाण हा २ पिस्तूले व काडतुसे विक्री करण्यासाठी दारूवाला पुलाजवळ येणार आहे. अशी माहिती समर्थ पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार समर्थ पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून पोलिसांनी १ गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली. तर त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचा मित्र मुनाफ रियाज पठाण याच्याकडून १ गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे असा एकूण २ पिस्तूले व ४ काडतुसे असा १ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग मंगशे शिंदे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे, नितीन अतकरे, कर्मचारी सुळील लोणकर, संतोष काळे, अनिल शिंदे, अजय शितोळे, बाळासाहेब भांगले, निलेश साबळे, सचिन पवार, शाम सुर्यवंशी, सचिन पवार, स्वप्नी वाघोले यांच्या पथकाने केली.