भारत हा देश बुध्द-गांधींचा आहे, तो गोळवलकरांचा होणार नाही, आ. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशभर सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात वातावरण तापलेले आहे. विविध ठिकाणी या कायद्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. यासंदर्भातच महाराष्ट्रात या कायद्याच्या विरोधात ठाणे शहरात पहिले आंदोलन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत या कायद्याच्या प्रती जाळल्या आणि हिटलरच्या वाटेने जाण्याचा आरोप करत हिटलरच्या प्रतिमेचेही दहन करून मोदी-शहा विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या.

जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला असून त्यांनी ‘भारत हा बुद्ध आणि गांधींचा आहे, तो कधीच गोळवलकरांचा होणार नाही’ अशी टीका त्यांनी केली. तसेच या विधेयकाबाबत भाजपाने सांगितले होते की, “पाकिस्तानी हिंदूंची संख्या घटत गेली आहे” त्यांच्या या वाक्याचा अर्थ काय समजायचा? ही मुस्लीम धर्मीयांना धमकी आहे काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच भारताने द्वेष आणि हिंसा ही मूल्ये कधीच स्वीकारली नाही तर देशाने बुद्ध आणि गांधी यांची अहिंसा आणि शांतता स्वीकारली आहे. त्यामुळेच आज भारत प्रगतीच्या दिशेने असून पाकिस्थान रसातळाला गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत मोदी सरकार मुर्दाबाद, धर्मांध सरकार हाय-हाय अशा घोषणा दिल्या. हे आंदोलन जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून ठाणे शहर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले. मोदी सरकारने राक्षसी बहुमताच्या जोरावर लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेतले आहे. या विधेयकामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच धर्माच्या आधारे नागरिकत्व ठरवण्यात येणार आहे. असेदेखील जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात आ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या गैर मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व मिळणार आहे. यात फक्त मुस्लिमांना वगळण्यात आले आहे. भाजप सरकार फक्त मुस्लिमांना वगळून इतरांना नागरिकत्व देऊ पाहत आहे. त्याची सुरुवात एनआरसी या कायद्याद्वारे झाली होती. भारताचे ५ वे राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबीयांनादेखील एनआरसी यादीतून वगळण्यात आले होते. देश दुभंगण्याचे राजकारण गेली सहा वर्षे सुरू आहे. असा आरोप देखील आव्हाडांनी उपस्थित केला आहे. तसेच ते म्हणाले की या विधेयकाद्वारे या देशामध्ये धार्मिक आधारावर देशाची मानसिकता बदलवण्याचे काम केंद्र सरकारने सुरु केले आहे अशी टीकादेखील त्यांनी केली.

आव्हाड पुढे म्हटले की, स्वामी विवेकानंदांनी भारत सर्वांना सामावून घेणारा देश आहे, असे म्हटले होते. तर, गोळवलकरांनी सांगितले की मुस्लीम, शीख, इसाई यांना नागरिकत्व देऊ नका आणि दिलेच तर त्यांना दुय्यम नागरिकत्व द्या. त्यांना मतदानाचा अधिकार नाकारा. याच पार्श्वभूमीवर १९५० साली आरएसएसने आणि जनसंघाने संविधानाला प्रचंड विरोध केला होता. तसेच आज मुस्लीम बांधव आहेत तर उद्या दलित असतील, ओबीसी आणि आदिवासीही असतील. त्यामुळे या देशाला वाचवायचे असेल तर सर्वांनीच या विधेयकाला विरोध दर्शविला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.

Visit : policenama.com