मोदी सरकारनं मोठ्या ‘थाटा-माटा’त सुरू केली PM-KISAN ‘स्कीम’, आता योजनाचे ‘तीन तेरा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षी लोकसभा निवडणूकीआधी छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना सहायत्ता देण्यासाठी आणलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या घटताना दिसत आहे. या योजनेंतर्गत छोट्या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात 6000 रुपये वर्षाला देण्याची व्यवस्था आहे. कृषि मंत्रालयाच्या पीएम किसान वेबसाइटनुसार योजनेंतर्गत एकूण 8.80 कोटी लाभार्थ्यांपैकी 8.35 कोटी छोट्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दोन-दोन हजार रुपये रक्कम देण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात लाभार्थ्यांची संख्या कमी होऊन 7.51 कोटी तर तिसऱ्या टप्प्यात 6.12 कोटी आणि चौथ्या टप्प्यात 3.01 कोटी इतकी कमी झाली.

यासंबंधित बंगळुरु स्थित इंस्टीट्यूट फॉर सोशल अ‍ॅण्ड इकोनॉमिक चेंजचे प्रोसेसर आणि अर्थतज्ज्ञ डॉ. प्रमोद कुमार म्हणाले की ही योजना छोट्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तयार करण्यात आली होती. परंतु आकड्यांवरुन हे स्पष्ट होत आहे की लाभार्थ्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. अनेक शेतकरी या योजनेतून बाहेर पडले आहेत. लाभार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे सांगताना ते म्हणाले की पोर्टलवर टाकण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये फरक दिसत आहे. याशिवाय योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे शेतकरी या योजनेतून बाहेर पडले.

ते म्हणाले की या कारणाने उत्तर प्रदेशात 1.4 कोटी तसेच संपूर्ण देशात 5.8 कोटी शेतकऱ्यांनी 4 था टप्पा मिळणार नाही अशी शक्यता आहे. पीएम किसान वेबसाइटनुसार पश्चिम बंगालला या योजनेत सहभागी करण्यात आले नाही आणि तेथील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. तर बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात ही संख्या कमी होत आहे. बिहारमध्ये 54.58 लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात 52.19 लाख शेतकऱ्यांना निधी मिळाला. तर तिसऱ्या टप्प्यात 31.41 लाख शेतकऱ्यांना निधी मिळाला.

उत्तर प्रदेशात 2.01 कोटी लाभार्थी होते, त्यात 1.85 कोटी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात निधी मिळाला तर तिसऱ्या टप्प्यात ही संख्या कमी होऊन 1.49 कोटी झाली. कुमार म्हणाले की या प्रकारे योजनेद्वारे शेतकऱ्यांना निधी मिळाला तर बियाणे, खते यासारखा कच्चा माल घेण्यास त्यांनी सुविधा मिळते. यामुळे फक्त शेतीला फायदा होतो असे नाही तर अर्थव्यवस्थेला देखील लाभ होईल.

सरकारने 2019-20 च्या अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. 1 डिसेंबर 2019 पासून या योजनेंतर्गत छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना सहायतेसाठी 6000 रुपये वर्षाला त्यांच्या खात्यात जमा होईल. ही रक्कम 2000 – 2000 रुपये अशी तीन टप्प्यात मिळणार आहे. 2018-2019 च्या चार महिन्यासाठी या योजनेंतर्गत 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. तर 2019 – 20 च्या अर्थसंकल्पात यासाठी 75,000 कोटी रुपयांची व्यवस्था आहे. तसेच अधिकृत सूत्रांनुसार मंत्रालयाने आतापर्यंत जवळपास 44,000 कोटी रुपये वितरित केली आहे. जी वितरित केलेल्या रक्कमेनुसार 58.6 टक्के आहे. कुमार म्हणाले की पीएम किसान सन्मान निधी सारख्या योजनेमध्ये समावेश करुन घेण्याची आवश्यकता आहे. जेणे करुन सर्व गरजूंना याचा फायदा होईल.

एका उत्तरावर कुमार म्हणाले की, गावात सरकारी खर्च वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात पीएम किसान योजनेंतर्गत वर्षाला एका टप्प्यात निधी द्यावा. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतील आणि त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत तेजी येईल. यामुळे कृषि क्षेत्राला गती मिळेलच आणि मागणी वाढून अर्थव्यवस्था देखील मजबूत होईल.