भ्रष्टाचाराविरोधात अधिकार्‍यानं दिलं जबरदस्त भाषण, तासाभरानंतरच लाच घेताना झाली अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये एक खळबळजनक असा प्रकार उघडकीस आला आहे. आंतराष्ट्रीय भ्रष्ट्राचार विरोधी दिनी भाषण केल्यानंतर काही तासांतच पोलीस उप-अधीक्षकाला लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

माधोपूर येथे अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात आंतराष्ट्रीय भ्रष्ट्राचार विरोधी दिनाचे औचित्य साधून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास डीएसपी मीणा या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध बोलताना त्या म्हणाल्या, “आपणास संपूर्ण प्रामाणिकपणे भारतास भ्रष्ट्राचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. केंद्र अथवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा,” असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

भाषणानंतर काही तासातच अटक

दरम्यान, भाषणाच्या काही तासानंतरच तब्बल ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी डीएसपी मीणा यांना अटक झाली. त्याचसोबत लाच देणाऱ्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्यासही अटक करण्यात आली. यासंदर्भात एसीबीचे महासंचालक बीएल सोनी म्हणाले, “कोटा परिसरात राहणाऱ्या डीएसपी भैरुलाल मीणा जे सवाई माधोपूरमध्ये एसबी पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्याविरुद्ध तक्रारी येत होत्या. एसबी चौकात अधिकाऱ्यांना बोलवून ते पैसे घेत असत. त्याच अनुषंगाने एसीबीचा एक चमू त्यांच्यावर नजर ठेवून होता.”

दरम्यान, “बुधवारी दलपुरा येथील डीटीओ महेशचंद मीणा यांना मासिक हप्त्याचे ८० हजार रुपये देताना या एसीबीच्या चमूस नरजेत पडले. त्यानंतर डीएसपी मीणा यांच्या घरावर छापा टाकल्यावर एसीबीच्या चमूला जमिनींची कागदपत्रे आणि १ लाख ६१ हजार रुपयांची रोकड सापडली. आता एसबीचा चमू त्यांच्या अन्य ठिकाणाचा शोध घेत आहे,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.