तांत्रिक बिघाडामुळे उशीर, मतदानासाठी रांगेत उभे राहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात आज १२ राज्यातील ९५ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या मतदानादरम्यान ओडिसामधील गंजम येथे मतदानासाठी रांगेत उभे असनाऱ्या एका ९५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

नटबारा बेहेरा नामक वृद्ध मतदानासाठी कुटुंबासोबत मतदान केंद्रावर पोहचले होते. मोठी रांग असल्याने त्यांना बराच वेळ उभा रहावं लागलं. त्यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तिथेच कोसळले.त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कंसमारी येथील रहिवाशी आहेत.

मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड

ओडिसातील काही मतदान केंद्रांवर इव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला उशिर झाला. राज्यातील अस्का लोकसभा मतदारसंघातील सनाखेमंडी येथील कंसमारी मतदान केंद्रावर ९५ वर्षाच्या वृद्धाचा चक्कर आल्याने मृत्यू झाला.

अकोल्यात ईव्हीएम मशीन फोडले

विदर्भातील तीन, मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर अशा महाराष्ट्रातील एकूण दहा जागांसाठी मतदान होत आहे. सोलापूरमधील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच, अकोला जिल्ह्यातील कवठा गावातील मतदान केंद्रावर आलेल्या श्रीकृष्ण नावाच्या मतदारानं ईव्हीएम फोडल्याची घटना घडली. ईव्हीएमला विरोध असल्यानंच मशीनची तोडफोड केल्याचा दावा त्यानं केला आहे. या घटनेमुळं मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत श्रीकृष्ण घ्यारे याला ताब्यात घेतलं आहे.