ओडिशा विधानसभेत भाजप आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

भुवनेश्वर : भाजपचे आमदार सुभाष पाणिग्रही यांनी काल विधानसभेत सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. देवगडमध्ये भात खरेदी होत नाही. सुमारे २ लाख क्विंटल धानाची सरकारकडून खरेदी केली गेलेली नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे पाणिग्रही यांनी सांगितले.

राज्यभरात धान खरेदीत गैरव्यवस्थेच्या आरोपावरुन शुक्रवारी भाजप आणि काँग्रेस सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या वेळी गोंधळ उडाला. त्यामुळे सभापती सूर्या नारायण पेट्रो यांना अनेक वेळा सभागृह तहकूब करावे लागले.

 

 

 

दुपारी भोजनसत्रानंतर पुन्हा कामकाज सुरु झाल्यावर ही घटना घडली. पाणिग्रही यांनी सॅनिटायझरची बाटली फोडली आणि ती पिण्याचा प्रयत्न केला. परंतु, संसदीय कामकाज मंत्री बिक्रम केशरी अरुखा आणि जवळच्या काही आमदारांनी त्यांना अडविले.

देवगड जिल्ह्यातील २९ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांमध्ये धान खरेदी झालेली नाही. शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण काय करत आहात, असे लोक विचारत आहेत. त्यामुळे मरण पत्करलेले चांगले, अशा शब्दात पाणिग्रही यांनी आपल्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे समर्थन केले.