शरद पवार अन् रोहित पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्विट; मुंबई पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडेंना पुण्यातून घेतलं ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ॲड. प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी (दि. 22) सकाळी पुण्यातील त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान मुंबई पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातच खेळणे बनले आहे. सरकारवर टीका करणे गुन्हा असेल तर तो आम्ही हजार वेळेस करू. प्रदीपच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल, असे ट्विट भाजपा आमदार राम सातपुते यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे वांद्रे येथील तालुका अध्यक्ष सागर जावळे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मुस्लिम समाज, शरद पवार आणि रोहित पवार यांच्याविरोधात प्रदिप गावडे यांनी ट्विटर हँडलवर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटबाबत 13 मेला जबाब जावळे यांनी दाखल केला. त्यावरूनच चौकशीसाठी गावडे यांना पुण्याहून मुंबईत चौकशीसाठी आणले आहे. मात्र, कोणताही एफआयआर किंवा 41 अ ची नोटीस दिली असता असे चौकशीसाठी घेऊन जाणे बेकायदेशीर असल्याचे गावडे यांचे वकिल संकते देशपांडे यांनी म्हटले आहे. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, पंढरपूर निवडणुकीदरम्यान रोहीत पवारांच्या प्रचारासंदर्भात काही ट्वीट केले होते. त्याविरोधात पुणे आणि मुंबईत गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्याला एफआयआरची कॅापी न देता बीकेसी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. 3 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांत अटक करता येत नाही, असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असूनही अटक झाली आहे.