१० हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – जमीनीच्या सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) करण्यात आली आहे. महेश भाट असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याला तत्कालीन जिल्हाधिकारी शितल उगले-तेली यांनी निलंबित केले होते. त्याने पुन्हा पनवेलला मोर्बे मंडळात बदली करुन घेतली.

खानाव येथील एक व्यक्ती  वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारावर नोंद करण्याकरीता वारंवार मंडळ अधिकारी भाट याच्याकडे फेऱ्या मारत असे. मात्र त्यांची अडवणुक केली जात होती याकरीता त्याने ५० हजाराची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. त्यातील १० हजार रूपये एका व्यक्तीकडे देण्यास सांगितले.ती रक्कम देताना लाच लुचपत विभाग अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पथकाने पकडले असल्याची माहिती पुढे आली आहे.

भाट हा या आगोदर मोर्बे मंडळ अधिकारी म्हणून काम करीत होता. चुकीची नोंद केली म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबीत केले होते. त्यानंतर त्याला तळा या ठिकाणी पाठविण्यात आले. मात्र काही महिन्यापुर्वी महेश भाट त्याच जागेवर रूजू झाल्याने आश्चर्य व्यक्त  करण्यात येत आहे. नियमानुसार तक्रारदाराची नोंद सोळा दिवसात होणे आवश्यक होते. परंतु पैशाकरीता त्याला विलंब करण्यात आला.