ऑईलचा टँकर उलटला, भीषण आगीच्या तांडवात होरपळून १ ठार

मुंबई : पोलीसनामा  – ऑईलने भरलेला टँकर उलटल्याने भीषण आग लागल्याची घटना वडाळ्यात आयमॅक्स सिनेमाजवळ घडली. या अपघातानंतर टँकरचे एकामागोमाग एक टायर फुटल्याने भररस्त्यात अग्नीतांडव सुरू झाले. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या भीषण आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितले. रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली.

वडाळा भक्ती पार्क येथे आयमॅक्स सिनेमाजवळ भर रस्त्यात हा टँकर अचानक उलटला आणि टँकरचे टायर फुटल्याने जोरदार स्फोट होऊन टँकरला भीषण आग लागली. टँकरमध्ये ऑईल असल्याने या आगीचा प्रचंड भडका उडाल्याने लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. व आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू  करण्यात आले होते. या भीषण आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या आगीमुळे आयमॅक्स रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत होता.

धक्कादायक ! धुळे जिल्ह्यात साडेतीन हजार कुपोषित बालके

धुळे : जिल्ह्यात बालकांमधील कुपोषणाची समस्या गंभीर आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नुकतीच जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या आरोग्य तपासणीत तब्बल तीन हजार ४०० बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. आता या बालकांना ग्राम बाल स्वास्थ्य केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.

बालकांमधील कुपोषणाची समस्या कमी करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न केले जातात. कुपोषणाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी माता गरोदर असल्यापासून गर्भाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध योजनादेखील शासन पातळीवर राबविण्यात येत आहेत. तरीदेखील बालकांमधील कुपोषणाची स्थिती गंभीर आहे. यावरुन कुपोषण निर्मूलनासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना तोकड्या ठरत असल्याचे सिद्ध होते. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार बालकांची आरोग्य तपासणी नुकतीच पूर्ण केली आहे.

या तपासणीत तब्बल तीन हजार ४०० बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. ही बालके तीव्र कमी वजनाची आहेत. बालकांना पुरेसा आहार योग्यरितीने मिळत नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. म्हणून कुपोषित बालकांच्या भरणपोषणासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे जिल्ह्यात ८२६ ग्राम बाल स्वास्थ्य केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये कुपोषित बालकांना दाखल करण्यात येणार आहे. ग्राम बाल स्वास्थ्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या कुपोषित बालकांना पोषण आहार दिला जाणार आहे. तसेच कुपोषण दूर होण्यासाठी आवश्यक औषधे दिली जाणार आहेत. पोषण आहार व औषधोपचारातून बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल यांनी दिली.