सोन्या-चांदीनं उच्चांकी गाठली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक स्तरावरील कारणांमुळे स्थानिक सराफा बाजारात मागणी वाढल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर बुधवारी 120 रुपयांनी वाढून महिन्यातील सर्वोच्च दर 39,510 प्रति दहा ग्रॅमवर पोहचला आहे. चांदीचे दर सुद्धा 990 रुपयांची मोठी उसळी घेऊन 47,500 प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे.

परदेशात मंगळवारी 1 % पेक्षा अधिक सोन्याने उसळी घेतल्याचे पहायला मिळाले. दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजार बंद असल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी स्थानिक बाजार सुरु होताच परदेशातील उसळीचा परिणाम दिसून आला. दिवाळीच्या आधीच दागिने बनवणाऱ्यांकडून मागणी वाढल्याने त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार आज न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात किरकोळ घसरण पहायला मिळाली.

सोने 1.97 डॉलरने घसरून 1,505.25 डॉलर प्रति औंसवर येऊन पोहचले. भविष्यातदेखील सोन्याची किंमत अजून वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

बाजार विश्लेषकांच्या मते अमेरिका आणि चीन दरम्यान होणाऱ्या व्यापार युद्धाबाबतच्या चर्चेतून समाधान होणार नसल्यामुळे गुंतवणूकदार सध्या सावधानी बाळगून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 0.14 डॉलरने उसळून 17.86 डॉलर प्रति औंस वर पोहचली आहे.

Visit : Policenama.com