सर्वात वृद्ध आशियाई हत्तीचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वात जास्त वयाचा आशियाई हत्ती म्हणून आेळखल्या जाणाऱ्या हत्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक वयाच्या असणाऱ्या या हत्तीचे नाव राजमंगल असे आहे. प्राणी संग्रहालयात राहत असणाऱ्या या हत्तीचा वयाच्या  70 व्या वर्षी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दीर्घ आजाराने राजमंगल या हत्तीचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.

छतबीड प्राणीसंग्रहालयात त्याला ठेवण्यात आले होते.तसे पाहिले तर साधारणपणे आशियाई हत्तीचे आयुष्य सुमारे 60 वर्षांचे असते. त्यामुळे राजमंगल हा हत्ती दीर्घायुषी ठरल्याचे दिसत आहे. मागील दोन वर्षांपासून राजमंगलची प्रकृती ढासळलेली होती. त्याच्या या आजारामुळेच त्याला लोकांसमोर आणले जात नव्हते. दरम्यान वृद्ध झालेला हा हत्ती दिवसेंदिवस अशक्त होत गेला आणि वृद्धावस्थेत आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला असे प्राणीसंग्रहालयाच्या प्रबंधकांनी सांगितले.

अंतराळातील धुळीत असू शकतात नवे ग्रह ?
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – संशोधकांनी केलेल्या संशोधनावरून अशी माहिती समोर आली आहे की,  पृथ्वी किंवा नेपच्यूनच्या आकाराचे नवे ग्रह काही तार्‍यांच्या आजूबाजूला असलेल्या धुळीच्या ढगांमध्ये लपलेले असू शकतात. खगोल शास्त्रज्ञांकडून सातत्याने नवनव्या ग्रहांचा शोध घेणे सुरू असते. विशेषतः परग्रहावरील जीवसृष्टीच्या शोधासाठी पृथ्वीसदृश ग्रह शोधण्यासाठी तर नेहमीच प्रयत्न सुरू असतात. मुख्य म्हणजे अशा ग्रहांची संख्या अनुमानापेक्षाही अधिक असू शकते.
अमेरिकेत अ‍ॅरिझोना विद्यापीठाचे संशोधक  वृषभ तारकापुंजात नव्या तार्‍यांची निर्मिती होण्याच्या ठिकाणाचे अध्ययन करीत होते. यादरम्यान अनेक ग्रह सुक्ष्म संरचनांच्या आच्छादनाखाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महत्त्वाचे  या सुक्ष्म संरचना म्हणजे नव्या ग्रहांचेच आंशिक रूपही असू शकते. असा अंदाजही वर्तवण्यात आला.
वृषभ तारकापुंज पृथ्वीपासून 450 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. इतकेच नाही तर वृषभ तारकापुंज वायू आणि धुळीने आच्छादलेला आहे. संशोधकांनी प्रोटोप्लॅनेटरी डिस्कने आच्छादलेल्या 32 तार्‍यांचे निरीक्षण केले, त्यावेळी त्यांना असे दिसले की यापैकी 12 नवे तारे आहेत. अशाच प्रकारे धुळीच्या आवरणाखाली अनेक नवे ग्रहही असू शकतात, असे त्यांना वाटते.