खा.रवींद्र गायकवाडांचा पत्ता कट ; ओमराजेंना उस्मानाबादची उमेदवारी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही दिवसांचा अवकाश राहिला असताना आता शिवसेनेने देखील आपली पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवार यादीत खासदार रवींद्र गायकवाड त्यांचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून पत्ता कट करण्यात आला आहे. यांच्या जागी शिवसेनेने माजी आमदार ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या उस्मानाबादमधील शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देण्याला विरोध होता. मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध केला. रवींद्र गायकवाड निवडणूक जिंकल्यापासून मतदारसंघात फिरकलेच नाहीत असा आरोप त्यांच्यावर शिवसैनिकांनी ठेवला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीवर गंभीर विचार झाला आणि त्यानंतर रवींद्र गायकवाड उमेदवारी कापण्यात आली आहे.

उस्मानाबादचे शिवसेना आमदार राहिलेल्या ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ओमराजे यांच्या व्यक्तिमत्व युवकांमध्ये प्रसिद्ध असून ते पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आहेत. ओमराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांचे पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळे ओमराजेंना तिकीट शिवसेनेने जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी पद्मसिंह पाटील यांच्या घरातील व्यक्तीला दिली जाण्याचा संभव आहे. आता उस्मानाबाद मतदारसंघातील मतदारांचे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घोषणेकडे लक्ष लागले आहे.