100 कोटी वसुलीच्या आरोपाच्या प्रकरणात HM अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाचा दणका तर परमबीर यांना दिलासा; HC नं दिले CBI चौकशीचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर घणाघाती आरोप करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहीले होते. परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनं राज्यातील राजकारण अगदी ढवळून निघालं. नंतर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन केलेल्या आरोपाच्या सीबीआय तपासाची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून त्यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितलं होतं. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली होती. त्याची आज सुनावणी झाली. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला अत्यंत महत्वाचे आदेश दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला परमबीर सिंग यांनी केलेल्या गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांची 15 दिवसांमध्ये चौकशी करा आणि त्याचा प्राथमिक अहवाल सादर करा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांना तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहेत. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर काही जणांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहेत. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला 100 कोटी रूपये जमा करायला सांगितले होते असा गंभीर आरोप केला होता. परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर महाविकास सरकारवर विरोधी भाजपाने गंभीर आरोप केले होते तर भाजपानं थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती.

उच्च न्यायालयानं सीबीआयला 15 दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करावी तसेच काही आक्षेपार्ह आढल्यास गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले असल्याचं याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी सांगितलं आहे.