परराज्यातून आणलेले दीड कोटीचे मद्य जप्त

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली असून दीड कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी हरियानातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई धुळे-औरंगाबाद रस्त्यावर मेहुणबारे बसस्थानकाजवळ सापळा रचून केली.

भारताबाहेर विक्रीसाठी तयार करण्यात आलेले मद्य चोर मार्गाने महाराष्टात विक्रीसाठी आणले जाणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह धुळे-औरंगाबाद रस्त्यावर मेहुणबारे बसस्थानकाजवळ सापळा लावला. दरम्यान, चोरटी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला मार्ग दाखवणाऱ्या ब्रिझा कारला (एच.आर. ९३-२२१२) ताब्यात घेतले. कार चालकाकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कारच्या पाठीमागुन येणाऱ्या संशयीत टाटा कंटेनरला (एच.आर. ७४. ७३४६) पथकाने अडविले.

पथकाने कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने धिरज ट्रान्सपोर्ट कंपनी संगरुळ पंजाब यांचे बिल, वाहतूक परवाना व त्यासोबतची कागदपत्रे पथकाला दाखवली. कागदपत्रांपैकी अर्ज एल- ३८ वर फेमस हॉर्स प्रिमियम व्हिस्की बॅच क्रमांक ०१ जानेवारी २०१९ असे नमुद केले होते. प्रत्यक्षात या मद्याच्या बाटलीची पाहणी केली असता त्यावर बॅच क्रमांक ००३ जानेवारी १९ असे नमुद केल्याचे पथकातील अधिकाऱ्यांना दिसले. पथकाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली.
ही कारवाई विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव, धुळ्याचे अधीक्षक मनोहर अंचुळे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.