परदेशी तरुणीवर बलात्कार करणारा ‘त्या’ संघटनेचा अध्यक्ष गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ओळखीचा गैरफायदा घेत मुंबईत परदेशी विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पद्माकर नांदेकर (वय ५१) असे त्याचे नाव आहे.
पद्माकर हा कफ परेड सहिवासी संघटनेचा अध्यक्ष आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पिडित विद्यार्थीनी युवा विनिमय कार्यक्रमांतर्गत भारतात आली होती. नांदेकर कुटुंबासोबत ती सहा महिने वास्तव्यास होती. पण या वर्षी मार्च महिन्यात ती दुसऱ्या कुटुंबासोबत वांद्रे येथे राहण्यास गेली. ओळख असल्याने १५ एप्रिल रोजी नांदेकरने या तरुणीला फोन करुन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले. त्यावेळी शितपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळण्यात आले. त्यामुळे ही तरुणी बेशुद्ध पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली. तेव्हा ती त्याच हॉटेलमधील रुममध्ये होती. त्यावेळी तिला आपल्यावर काय प्रकार घडला आहे, हे लक्षात आले.

त्यानंतर सकाळी उठून ती थेट सध्या रहात असलेल्या वांद्रे येथील घरी गेली. तिच्या वागणूकीत बदल झाल्याचे लक्षात आल्यावर त्या कुटुंबियांनी काही दिवसांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ते कुटुंब या तरुणीला घेऊन कफ परेड पोलीस ठाण्यात आले व त्यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी नांदेकर याला अटक केली आहे.