पुणे : आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ‘तिचे’ प्राण ‘खाकी’ वर्दीतल्या ‘तिनं’ वाचवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचे प्राण खाकी वर्दीतल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने वाचवून माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले. घरामध्ये सतत होणाऱ्या कौटुंबिक वादातून एका महिलेने हाताची नस कापून घेत आणि विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिलेचे प्राण हडपसर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील यांनी वाचवले त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

घटनेबाबात राजश्री पाटील यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी एकच्या सुमरास हडपसर गाडीतळ येथे एका महिलने विषारी औषध प्राशन केले असून मला मदतीची गरज असल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला सांगितले. हा मेसेज मिळताच बीट मार्शल अमोर बाबर आणि विलास राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहचलो असता महिलेने घराला आतून कडी लावून घेतली होती. त्यामुळे दरवाजा तोडून आम्ही घरात प्रवेश केला. त्यावेळी त्या महिलेने हाताची नस कापल्याचे आणि विषारी औषध पिल्याने ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. संबंधित महिलेला तात्काळ रिक्षातून जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र, अपुऱ्या सुविधांमुळे तिच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. डॉक्टरांनी त्या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात दाखल केला. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केल्याने तिचे प्राण वाचल्याचे राजश्री पाटील यांनी सांगितले.

काही वेळाने महिला शुद्धीवर आल्यावर तिच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने घरात पतीसोबत सतत वाद होत होते. त्यामुळे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता ही महिला व्यवस्थित आहे. या महिलेवर उपचार करण्यासाठी थोडाजरी वेळ लागला असता तर तिच्या जिवाला धोका होता, असे डॉक्टरांनी सांगितले.