टाकी न बांधताच १ लाखाचे बिल काढले

सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाण्याच्या टाकीचे बांधकाम न करताच सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून ठेकेदाराला एक लाख रुपये अदा केले. चौदावा वित्त आयोगाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सरपंच गणपत नामदेव वाघ (रा. वेळापूर, ता. कोपरगाव), ग्रामसेवक विनोद गिरीधर माळी (रा. कोपरगाव), ठेकेदार सुनील महादेव गुंजाळ (रा. मढी, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील वेळापूर गावात पाण्याची टाकी बांधण्याचा प्रस्ताव होता. वेळापूर ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मिळाला होता. सदर कामासाचा ठेका सुनील गुंजाळ याला देण्यात आला होता. पाण्याच्या टाकीचे कोणतेही बांधकाम न करतात सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने ठेकेदाराला एक लाखाचा धनादेश दिला. तो धनादेश वटवून एक लाख रुपयांची रक्कम काढून शासनाची आर्थिक फसवणूक केली.

सदर कामाबाबत काही ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात तक्रार केली होती. त्यावरून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे हे करीत आहेत.