लासलगावला सोमवारपासून कांदा लिलाव ! कोरोना चाचणी करूनच बाजार समितीत प्रवेश

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव नाशिक जिल्ह्यात कमी होत असल्याने लासलगावसह जिल्ह्यातील १५ प्रमुख बाजार समित्यांमध्ये २४ मे पासून कांदा व धान्य लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे यावेळी बाजार समितीचे कर्मचारीवर्ग तसेच व्यापारी, हमाल-मापारी व शेतकऱ्यांनी रैपिड एंटीजन टेस्ट करून लिलावाच्या कामकाजात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहे.

गेल्या १२ मे पासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढल्याने लासलगावसह प्रमुख बाजार समित्या बंद असल्याने जिल्ह्यातील कांद्याची साधारण ३०० कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली होती. यादरम्यान शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी पर्याय नसल्यामुळे शेतात कांदा पडून होता आता कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने सोमवारपासून कांदा व इतर शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच गर्दी होण्याची दाट शक्यता गृहित धरून शेतमाल विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची कोरोना तपासणी करूनच बाजार समितीत प्रवेश दिला जाणार आहे.

सोमवारपासून प्रशासनाच्या आदेशानुसार शेतमाल लिलाव चालू होणार असून बाजार समितीचे आवारात प्रवेश करताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. वाहनासोबत फक्त एकाच व्यक्तीस प्रवेश दिला जाणार आहे. शासनामार्फत तसेच स्थानिक प्रशासनामार्फत कोरोना महामारीसंदर्भात वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे व आदेशाचे काटेकोरपणे पालन करून बाजार समितीस सहकार्य करावे , असे आवाहन बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी बाजार समितीत आल्यानंतर वाहनामध्ये किमान ३ ते ५ फूट अंतर सोडावे व वाहने रांगेत उभी करावी. ज्या वाहनाचा लिलाव सुरू असेल, त्या शेतकऱ्यानेच वाहनाजवळ थांबावे, इतरांनी आपआपल्या वाहनाजवळ थांबावे व गर्दी करू नये, सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.