खासदार राऊतांच्या ‘झोडपण्या’च्या इशाऱ्यानंतरही शिवसैनिकाचे ‘नाणार’ला खुले ‘समर्थन’ !

राजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतर देखील रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली. असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजरी लावली. नाणार रिफायनरीचा विषय संपला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली होती. तरी देखील आजच्या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

कात्रादेवी येथील सभेत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांची हाकालपट्टी केल्याचेही सांगितले. यावेळी शिवसेनेचा गमछा किंवा झेंडा घेऊन कोणी शिवसैनिक रिफायनरीला पाठिंबा देईल त्याची गय केली जाणार नाही हा त्यांनी इशारा समजावा. यापुढे जो शिवसैनिक रिफायनरीचे समर्थक करेल त्याला झोडून काढावे, असेही त्यांनी सांगितले होते.

मात्र, आज दुपारी नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ बोलविण्यात आलेल्या मेळाव्याला हजारो लोक उपस्थित राहिले होते. यामध्ये अनेक जणांनी शिवसेनेची भगवी टोपी, गमछा घातला होता. यामुळे खासदारांचे आदेशाच शिवसैनिक मानत नसल्याचे चित्र आज राजापूरमध्ये दिसले. मेळाव्यासोबत सत्यनारायणाची पूजाही आयोजित करण्यात आली होती.