आश्वासन न पाळल्यास देशभर फिरून अधिक तीव्र आंदोलन करणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारने दिलेल्या मुदतीत आश्वासन पूर्ण केले नाही, तर देशभर फिरून लोकांमध्ये सरकारचा खोटारडेपणा उघडा करून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला.

लोकपाल व लोकायुक्त यांची नियुक्ती, शेतमालाला दीडपट भाव मिळावा आदी मागण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण काल सातव्या दिवशी मागे देण्यात आले. त्यानंतर आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, मागण्या पूर्ण  करण्यासाठी सरकारने विशिष्ट मुदत घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास सरकार किती खोटारडे आहे. हे देशभर फिरून जनतेला सांगेल. त्यानंतर जनतेच्या पाठिंब्याने मोठे आंदोलन उभे केले जाईल.

उपोषण मागे घेतले म्हणून आंदोलन थांबलेले नाही. सरकारने दिलेल्या मुदतीत आश्वासनांची पूर्तता केली नाही, तर हे आंदोलन अधिकच चिघळेल, असेही हजारे म्हणाले.