गुंड मारणे याच्या संदर्भातील ‘त्या’ आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी बाजू मांडण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुंड गजानन मारणे याला सातारा येथील कारागृहात हलविण्या संदर्भात न्यायालयाच्या
आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी न्यायालयाने तुरुंग अधीक्षक यु.टी. पवार आणि उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

कारागृह प्रशासनाकडून न्यायालयात हजर करण्यासाठी पैसे आणि भेटवस्तूंची मागणी केली जाते. अशी तक्रार गजा मारणे यांनी न्यायालयाकडे नुकतीच केली होती. त्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही झाली नाह. अशी तक्रार मारणेच्यावतीने ऍड. विजय ठोंबरे आणि हितेश सोनार यांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल करीत पवार आणि साठे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. ह्या अर्जावर न्यायालयाने कारागृह अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचप्रमाणे तुमच्या विरुद्ध न्यायालयाच्या आदेशाचा अवमान प्रकरणी कारवाई का करू नये ? असेही आदेशात नमूद केले आहे.
कारागृह प्रशासनाकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप करीत मारणे यांनी दुसर्‍या कारागृहात ठेवण्यात यावे अशी मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करीत आणि कारागृह प्रशासनाची बाजू ऐकून मारणेला सातारा येथील कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. आणि त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितला होता. कारागृह प्रशासनाने मारणेला सातारा येथील कारभारात पाठवले नाही, त्याचप्रमाणे अहवालही सादर केला नाही.  असा अर्ज ठोंबरे यांनी न्यायालयात दिला.

न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर ही कारागृह प्रशासनाने आरोपी मारणे याला मानसिक त्रास देण्याच्या हेतूनेच येरवडा कारागृहात ठेवले आहे, असा आरोपही केला आहे.  आपण कायद्याला जुमानत नाही अशीच प्रवृत्ती अधिकाऱ्यांची दिसून येत आहे. आरोपीला नजीकच्या कारागृहात हलवण्या संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितल्यानंतर साठे यांनी आरोपीला नागपूर येथील कारागृहात ठेवण्याचा अहवाल दिला होता. यावरून कारागृह प्रशासनाची मानसिकता लक्षात येत आहे . असेही अर्जात नमूद केले आहे.