VIDEO : बेरूतमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना, बंदरात भयंकर आगीच्या लोटांसह आकाशात पसरला काळा धूर

बेरूत : पोलीसनामा ऑनलाइन – लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मागील महिन्यात झालेल्या भयंकर स्फोटानंतर पुन्हा एकदा हृदयाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. आता तेथील एका बंदरात भीषण आग लागली आहे. आगीतून भयंकर ज्वाला निर्माण होताना दिसत आहे आणि चारही बाजूंना काळा धूर पसरला आहे. घटनास्थळावर फायरब्रिगेडच्या अनेक गाड्या पोहचल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंदरात आग लागल्यानंतर तेथे हलकोल्लाळ सुरू आहे.

या घटनेवर लेबनानच्या लष्कराने म्हटले आहे की, इंजिनचे तेल आणि टायर्सच्या एका गोडाऊनमध्ये आग लागली, या आगीने विक्राळ रूप धारण केले आहे. हेलीकॉप्टर्सच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंदरावर लागलेली भीषण आग आणि आकाशात पसरलेला काळा धूर पाहून लोकांना एक महिन्यापूर्वी घडलेल्या दुर्घटनेची आठवण झाली.

बेरुतमध्ये मागील चार ऑगस्टला झालेल्या स्फोटात 191 लोकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे सहा हजार लोक जखमी झाले होते. स्फोट इतका भीषण होता की, सर्वत्र विध्वंसाचे दृश्य होते. हा स्फोट बेरुतच्या बंदरात 2013 मध्ये एका शिपमेंटमधून आलेल्या 2,750 टन अमोनियम नायट्रेटचा झाला होता. स्फोट इतका तीव्र होता की, त्याचा आवाज 160 किलोमीटर दूर सायप्रसपर्यंत ऐकू गेला होता. बेरूतचे गव्हर्नर मारवन अबोद यांनी सांगितले की, स्फोटामुळे सुमारे निम्म्या शहराचे नुकसान झाले होते. या भीषण स्फोटामुळे शहराचे 15 अरब डॉलर (सुमारे एक लाख दहा हजार कोटी रुपये) पर्यंतचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, तर तीन लाख लोक बेघर झाले होते.