Coronavirus : सहकारी महिलेला ‘कोरोना’, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू ‘क्वारंटाईन’मध्ये

जेरूसमेल : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा संसर्ग फक्त सामान्य नागरिकांनाच होत नाही तर अति महत्त्वाच्या लोकांना देखील होत आहे. त्यामुळे प्रत्येक जण भयभीत झाले आहेत. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सहकाऱ्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर नेतान्याहू यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.

आतापर्यंत इस्रायलमध्ये 4 हजार 347 जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले 134 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण इस्त्रायलमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लोकांना फक्त आत्यावश्यक वस्तू खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तू घरापासून 100 मिटर अंतराच्या आतच खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

इस्त्रायलमधील एका वृत्तपत्राने नेतान्याहू यांच्या कार्यालयाचा हवाला देत म्हटले आहे की, नेतान्याहू यांनी तपासणी होईपर्यंत क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील प्रिन्स चार्ल्स, पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे सर्व नेते क्वारंटाईनमध्ये आहेत. यापूर्वी कोरोनाचा धोका पाहता ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बकिंगहॅम पॅलेसमधून विन्डसर कॅसलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.