किल्ले रायगडावर 11 कोटींपैकी केवळ 37 लाखांचे काम

पोलिसनामा ऑनलाईन – रायगड प्राधिकरणाकडून पुरातत्व खात्याला संवर्धनाचे कामासाठी 11 कोटींचा निधी वर्ग केला आहे. त्यापैकी केवळ 37 लाखांचे काम करण्यात आले आहे. अशाच पद्धतीने काम सुरू राहिले तर हे काम आणखी 25 वर्षे होणार नाही, अशी खंत व्यक्त करीत पुरातत्व खात्याच्या देखरेखेखाली हे काम रायगड प्राधिकरणाकडे सोपवावे. अशी मागणी केली असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

लॉकडाउनमुळे किल्ले रायगडावर प्राधिकरणामार्फत सुरु असणार्‍या संवर्धनाचे कामाला खंड पडला होता. कामे पुन्हा सुरु झाली असून किल्ले रायगडावरील हत्ती तलाव, गंगा सागर तलावांसह इतर 11 छोटी तलाव व टाके यांची गळती शास्त्रोक्त पद्धतीने काढलीआहेत. अद्यापही 25 ते 30 टक्के गळती असून भविष्यात गडावर पाण्याची टंचाई भासणार नाही. असा विश्वास रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी महाड येथे व्यक्त केला आहे. याचबरोबर पुरातत्व खात्याने हत्तीखाना येथे छोटे म्युझियम करून किल्ले रायगडावर उत्खननात सापडले पुरातन वस्तू या ठिकाणी पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवाव्यात. श्री शिवाजी स्मारक मंडळाचा रायगड रोपवे ज्या जागेवर उभा आहे त्या जागेची मालकी औकिरकर कुटुंबाची आहे, असा दावा या कुटुंबियांनी केला आहे. प्रत्यक्ष मोजणी झाल्यानंतर याबाबतचे सत्य समोर येईल. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांच्या सोबत असणारा धनगर समाज हा प्रामणिक समाज आहे. त्यांना संरक्षण देणे ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज व छत्रपती शाहू महाराजांचा नातू या नात्याने माझी जबाबदारी असल्याचे संभाजी राजांनी स्पष्ट केले.