चिंताजनक ! राज्यात तब्बल 5000 जण ‘कोरोना’बाधितांच्या जवळून संपर्कात : आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. देशातही या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातल्यात्यात सर्वाधिक आकडा हा महाराष्ट्रातून समोर येत आहे. या दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या जवळून संपर्कात असलेल्या ५ हजार जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिल्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी संबंधित माहिती दिली. राज्याच्या राजधानी मुंबईत सर्वाधिक १६२ रुग्णांची नोंद आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे ते बाहेर फिरुन संसर्ग वाढण्याचा धोका टाळता येईल.

आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईत सध्या १६२ कोरोनाबाधित असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या ५३४३ एवढी आहे. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांचीही चाचणी केली जाणार आहे. तसेच रुग्णालयांच्या समोर आता संशयितांची चाचणी वेगाने करण्याचं आव्हान आहे. मुंबईत ५ सरकारी आणि ७ खाजगी रुग्णालयांमध्ये चाचणी केली जात आहे. एका दिवसाला दोन हजार चाचण्या करण्याची क्षमता सध्या मुंबईत आहे. याशिवाय अतिरिक्त मास्क आणि व्हेंटिलेटर्सचीही तयारी केली जात असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रात संक्रमितांचा आकडा ३२० च्या वर पोहोचला आहे. तर, आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारकडून सर्व प्रकारच्या खबरदारऱ्या घेतल्या जात असूनही चिंतेत भर पडत आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे ३२० पैकी ३९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईनंतर पुणे ३८, सांगलीत २५ रुग्ण आहेत. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.