जादा व्याजदराच्या आमिषाने ३९ लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुंतवमुकीवर जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका दाम्पत्याने चार जणांनी ३९ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जुलै २०१४ ते फेब्रुवारी २०१९ या दरम्यान घडला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दांपत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलींद जनार्दन पिंपळकर आणि त्यांची पत्नी मोहिनी पिंपळकर (रा. सिंहगड रस्ता) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास वसंतराव कुरडे (वय ५२,रा. भेलकेनगर, कोथरुड) यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दांम्पत्याने दोन वर्षापूर्वी रिअल एज्युकेशन फर्मची जाहिरात वृत्तपत्रामध्ये दिली होती.

या जाहिरातीमध्ये त्यांनी रियल एज्युकेशन फर्ममध्ये गुंतवणुक केल्यास दरमहा ३ टक्के दराने व्याज देण्याचे आमिष दाखवले होते. जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर कुरडे यांनी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी स्वत: च्या नावाने ५ लाख आणि मुलाच्या नावाने ६ लाख असे एकुण मिळून ११ रुपये पिंपळकर दाम्पत्याकडे गुंतविले. त्यानंतर गेले दोन वर्ष पिंपळकर दाम्पत्याने कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुरडे यांनी पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिला होता. पिंपळकर दाम्पत्याने अशा प्रकारे संजय भेलके (रा. धायरी ), भरत विटुरकर तसेच कोंढवा भागातील एका महिलेची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. प्राथमिक तपासात पिंपळकर दाम्पत्याने कुरडे, भेलके, विटुरकर आणि महिलेची एकुण मिळून ३९ लाख ४ हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पिंपळकर दाम्पत्याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एम. रायकर तपास करत आहेत.