देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 36 लाखांच्या पुढं, दिल्लीला मागे टाकत पुणे बनले Corona ‘हब’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. काल 1 हजार 931 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे शहराने रुग्णसंख्येत राजधानी दिल्ली शहरालाही मागे टाकले आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या ही 1 लाख 75,105 इतकी झाली असून दिल्लीची रुग्णसंख्या 1 लाख 74,748 आहे. त्यामुळे पुणे शहर हे देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले शहर बनले आहे.

देशातील सर्वाधिक 52 हजार 172 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण महाराष्टृात आहेत. जे मुंबईतील 20,000 आणि दिल्लीतील 15,000 यांच्यापेक्षा खूपच अधिक आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात आजवर 4,069 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1,18,324 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना संसर्गाला सुरुवात झाली तेव्हापासून पुणे जिल्हा प्रशासन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

राज्यातील पहिला रुग्ण हा पुण्यातच नोंदवला गेला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र, यामध्ये उद्याप तरी म्हणावे असे यश आले नाही. दरम्यान, काल देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 36,21,245 वर पोहोचली. यांपैकी 27,74,801 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजवर 4 कोटी 23 लाख 07 हजार 914 करोना नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.