चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल, म्हणाले – ‘ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर केंद्राने द्यावे, मग तुम्ही काय झोपा काढताय की चपात्या भाजताय’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लसीचा तुटवडा जाणवत आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी केंद्र सरकारवर दुजाभावाचा आरोप करत आहेत तर भाजप नेतेही ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर सर्वच केंद्र सरकारने द्यावे, मग तुम्ही काय झोपा काढताय? की चपात्या भाजताय असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक गोष्ट जर केंद्र सरकार करणार असेल, लसीच्या बाबतीत जर आपण केंद्रावर अवलंबून असू पण केंद्राने आता तुम्हाला मोकळीक दिली आहे. तुम्ही महाराष्ट्रात निर्मिती करु शकता. इतर राज्यातून देशातून आणू शकता. ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणी रोखले होते का. तुम्ही म्हणताय की मी सहा महिन्यांपूर्वी म्हटले होते. मग काय केल तुम्ही? चपात्या भाजल्या का? ऑक्सिजन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ऑक्सिजनची क्षमता वाढवण्यासाठी का सांगितले नाही? रेमडेसिवीरच देखील तसेच आहे. तुमच्या राज्यात ज्या कंपन्या आहेत त्यांना प्रोडक्शन वाढवण्यास सांगितलं का नाही? आम्ही ऑक्सिजन निर्मिती करणार नाही, आम्ही रेमडेसिवीर करणार नाही, आम्ही पीपीई किट निर्मिती करणार नाही, आम्ही लस निर्मिती आणि आणण्यासाठी धडपड करणार नाही सरळ केंद्राकडे बघायचे असे म्हणत पाटील यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

तसेच पुणे महापालिकेकडून सोमवारपासून ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे. महिन्याभरात जेवढे रुग्णालय आहेत त्यांना इतरांकडून ऑक्सिजन घेण्याची गरज पडणार नाही. जर पुणे महापालिका करु शकते तर सरकार काय झोपा काढत आहे का, असे पाटील म्हणाले. जगातील विविध देश आपल्याला मदत करत आहेत. तुम्ही जर म्हणाल की आमच्या देशातल आम्ही बाहेर देणार नाही. जगात ज्यावेळी तुम्हाला प्रमुख देश म्हणून काम करायचे असते, त्यावेळी अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करायची असते. मी इतकच सांगेल की अजितदादा एवढे ज्ञान मला नसल्याचे ते म्हणाले.